फेसबुकवर गेम्स किंवा क्विझ खेळताना घ्या काळजी

facebook
आजच्या काळामध्ये जगातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि जगभरामध्ये विखुरलेल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडीयाचे माध्यम खूपच प्रभावी ठरत आहे. त्यातून फेसबुक सारख्या सोशल मिडिया वेबसाईट अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत. फेसबुक पहात असताना त्यावर असलेल्या गेम्स, किंवा काही क्विझ खेळण्याची मजा आपण कधी कुतुहल म्हणून, तर कधी विरंगुळा म्हणून घेत असतो. मात्र या गेम्स खेळताना ‘identity theft’ सारख्या गुन्ह्याला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. म्हणजेच या गेम्स खेळत असताना आपली खासगी माहिती हॅकर्सच्या हाती लागून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
facebook1
मॅसच्युसेट्स येथील सटन पोलीस विभागाकडून याबद्दलचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. अगदी साध्या आणि मनोरंजक वाटणाऱ्या गेम्स आणि क्विझच्या माध्यमातून फेसबुक युझर्स (फेसबुक सारख्या वेबसाईट वापरणारे/पाहणारे) स्वतःच्याही नकळत त्यांची खासगी माहिती उघड करीत असतात. या गेम्स किंवा क्विझ सुरु करताना यांच्या द्वारे बहुतेकवेळी युझरचा ‘प्रोफाईल’ पाहिला जात असतो. या प्रोफाईल द्वारे युझरची सर्वच खासगी माहिती उघड होत असून, याचा गैरफायदा हॅकर्स द्वारे घेतला जाण्यची शक्यता असते. त्याचप्रमाणे अनेकदा, ‘तुमची जवळची मित्र/मैत्रीण कोण’, ‘तुमचा जन्म कुठे झाला’ या आणि तत्सम प्रश्नांवर ‘कॉमेंट’ करण्यास युझर्सना सांगितले जाते, आणि युझर्स या कॉमेंट्सद्वारे स्वतःहून ही खासगी माहिती उघड करीत असतात.
facebook2
अश्या प्रकारच्या गेम्स किंवा क्विझच्या द्वारे जरी फारशी माहिती दिली जात नसली, तरी ही माहिती आणि तुमच्याबद्दल उपलब्ध असलेला इतर डेटा मिळून तुमची जवळ जवळ सर्वच खासगी माहिती उपलब्ध होत असते. या माहितीद्वारे तो ठराविक युझर कुठे राहतो, त्याच्या संपर्कामध्ये असणाऱ्या इतर व्यक्तींबद्द्लची माहिती, इतकेच नाही, तर ती व्यक्ती वापरीत असलेले पासवर्ड शोधून काढण्याचे कामही हॅकर्सनी केले असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. म्हणूनच सोशल मिडियावर स्वतःबद्दल माहिती देताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असून, अश्या प्रकारच्या गेम्स किंवा क्विझ खेळण्याचा मोह टाळला जाणे आवश्यक आहे.

Leave a Comment