मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेत १७ जणांना करोना

मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये भारताच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्स खिताब जिंकला आणि आता सारया भारतवर्षाच्या नजरा मानसा वाराणसीवर लागल्या आहेत कारण पोर्तोरिको येथे होत असलेल्या मिस वर्ल्ड स्पर्थेत ती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या स्पर्धेच्या आयोजनात मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक अन अन्य कर्मचारी वर्गापैकी १७ लोकांची करोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने त्या सर्वाना विलगीकरणात ठेवले गेले आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार १६ डिसेंबर रोजी १७ लोक करोना पॉझीटिव्ह आले असून पोर्टोरीकोच्या आरोग्य विभागानेही त्यांची पुष्टी केली आहे. या सर्वाना करोनाची हलकी लक्षणे आहेत आणि परिस्थिती गंभीर नाही असा खुलासाही केला गेला आहे. स्पर्धेत कोविड प्रोटोकॉलचे काटेखोर पालन केले जात आहे आणि त्यानुसार सर्व करोना बाधिताना १० दिवस विलगीकरणात ठेवले गेले असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. स्पर्धेच्या अध्यक्ष ज्युलिया मार्ले म्हणाल्या, जो पर्यंत बाधित झालेल्या स्पर्धकांचा करोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना स्टेजवर जाता येणार नाही.

यंदा या स्पर्धेत नियम बदल केला गेला आहे. कोणाही स्पर्धकाचे स्वप्न अपुरे राहू नये यासाठी कोणताही निर्णय जाहीर करण्यापूर्वी स्पर्धकाचे मागचे रेकॉर्ड लक्षात घेतले जाणार आहे. जुने व्हिडीओ पाहून मगच निर्णय घेतला जाईल. यंदा स्पर्धेचा ७० वा वर्षापनदिन आहे. सहभागी झालेल्या सर्वाना कोविड १९ लसीचे दोन्ही डोस दिले गेलेले आहेत. यंदा ९८ देशांच्या सुंदरी या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये करोना मुळे ही स्पर्धा रद्द केली गेली होती. त्यामुळे जमिकाची मिस वर्ल्ड टोनी एला सिंग हिची कारकीर्द  इतिहासातील सर्वात दीर्घ काळ मिस वर्ल्ड अशी नोंदली गेली आहे.