अॅपलच्या या गॅजेटचा महागड्या गाड्या चोरीसाठी होतोय वापर

महागडी कार पाहता पाहता चोरी होण्याचे प्रकार कॅनडा मध्ये वाढीस लागले असून कॅनडा योर्क पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अॅपलच्या एअरटॅगचा वापर करून चोरटे महागड्या गाड्या चोरून नेत आहेत. कीचेन म्हणूनही वापरता येणारे हे उपकरण आकाराने अतिशय छोटे आहे. हे एअरटॅग किल्ल्या, किंमती सामान कुठे विसरले असेल किंवा सापडत नसेल किंवा चोरीला गेले असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी वापरले जाते. हे एक ब्ल्यूटूथ एनेबल्ड डिव्हाईस आहे. युजर्स अॅपल माय फाईंड अॅपच्या माध्यमातून चोरी किंवा हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी हे पर्स किंवा पाकिटात ठेवतात.

मात्र चोरटे या डिव्हाइसचा वापर महागड्या कार चोरण्यासाठी करत आहेत असे दिसून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार चोरट्यांनी कार चोरीसाठी ही नवी पद्धत वापरात आणली आहे. अॅपल एअरटॅग आकाराने खूपच छोटे आहे त्यामुळे ते कुठेही लपविता येते. चोर कारचालक, प्रवासी असल्याचे भासवून अन्य हत्याराने कारचा दरवाजा उघडून आत शिरतात. डॅशबोर्ड खाली बरेचदा मेकॅनिक फॅक्टरी सेटिंगचा प्रोग्राम वापरण्यासाठी जे इलेक्ट्रोनिक डिव्हाईस वापरतात ते बसविलेले असते. त्यात नवीन की प्रोग्राम घातला कि वाहन सुरु होते आणि चोर या पद्धतीने वाहने पळवून नेतात.

अॅपलने त्यांच्या एअरटॅगचा वापर अश्या पद्धतीने कार चोरीसाठी होतो यावर कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र पोलिसांनी कार मालकांना सावध राहण्याच्या, ड्राईव्ह वे ऐवजी गॅरेज मध्ये कार पार्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत.