ओमिक्रॉनमुळे बॉलीवूडचे ३ हजार कोटी टांगणीला?
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोट्यावधीचे नुकसान सोसावे लागलेल्या बॉलीवूडला आत्ताच कुठे जरा बरे दिवस दिसू लागले असताना नवीन आलेल्या ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा बॉलीवूड उद्योग धास्तावला आहे. येत्या सहा महिन्यात बॉलीवूडचे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आली तर बॉलीवूडला किमान ३ हजार कोटीचा फटका सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
करोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरीयंटची भीती जगाला ग्रासून राहिली आहे. करोना काळात किमान १ वर्षभर चित्रपट गृहे बंद राहिली, वारंवार लॉकडाउन लावावे लागले यामुळे बॉलीवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होऊ शकले नव्हते आणि त्याचा मोठा फटका या उद्योगाला सहन करावा लागला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर आल्यावर जीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे. देशात चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाली आहेत आणि रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या सूर्यवंशी ने रेकॉर्डतोड कमाई केली असून त्यामुळे अन्य निर्मात्यांचा उत्साह वाढला आहे. अश्या वेळी पुन्हा एकदा ओमिक्रॉन चे सावट आले आहे.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला तर त्याचा हातभार देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच लागतो. येत्या सहा महिन्यात बॉलीवूडच्या अनेक बड्या फिल्म्स रिलीज होणार आहेत. त्यातून १०० ते २०० कोटींचा गल्ला जमवतील अश्या चित्रपटाची संख्या मोठी आहे. मात्र पुन्हा चित्रपटगृहे बंद झाली तर सारा डाव हुकणार आहे. येत्या सहा महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटात स्पायडरमॅन नो वे होम, आशिकी, ८३, जर्सी, राधेश्याम, पृथ्वीराज, लालसिंग चध्ढा, सालार या चित्रपटांचा समावेश आहे.