ओमिक्रॉनची अमेरिकेत एन्ट्री
करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रॉनचा जगभर वेगाने फैलाव होऊ लागला असून द. आफ्रिकेनंतर २४ देशात तो पोहोचला आहे. दरम्यान अमेरिकेत ओमिक्रॉनची एन्ट्री झाली असून या व्हेरीयंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण बुधवारी रात्री अमेरिकेत सापडला आहे. कॅलिफोर्निया मध्ये सापडलेली ओमिक्रॉन संक्रमित व्यक्ती २२ नोव्हेंबर रोजी द. आफ्रिकेतून परतली होती. त्यानंतर सहा दिवसांनी त्याच्यामध्ये करोना लक्षणे दिसल्यावर चाचणी केली तेव्हा त्याला ओमिक्रॉन करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या व्यक्तीने कोविड १९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
ओमिक्रॉनची गंभीर दखल अमेरिकेने घेतली असून अध्यक्ष जो बायडेन आज त्या संदर्भात कठोर निर्णय घेऊ शकतील असे सांगितले जात आहे. द. आफ्रिकेवर अगोदरच प्रवास बंदी घातली गेली आहे मात्र आता अन्य देशातून येणाऱ्यानाही प्रवास बंदी घातली जाईल असे सांगितले जात आहे. अमेरिकेत येणार्यांना कोविड १९ लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी कोविड टेस्ट बंधकारक केली गेली असल्याचे समजते.
जगभरातील ३० देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली असून चीनने अगोदरच सीमेवर कडक प्रतिबंध लागू केले आहेत. चीनी नागरिक आणि परमीट असलेले प्रवासीच फक्त चीन मध्ये प्रवेश करू शकणार आहेत. इस्रायल,मोरोक्को आणि जपान ने त्यांच्या सीमा पूर्ण बंद केल्या आहेत आणि परदेशातून स्वदेशी येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. लसीकरण झालेल्या नागरीकांसाठी सुद्धा हाच नियम राहणार आहे.