ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल यांना मिळणार इतका पगार
ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ पदावरून जॅक डोर्सी पायउतार झाल्यावर ही जबाबदारी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्यावर सोपविली गेली आहे. त्यामुळे आणखी एक भारतीय अमेरिकेतील नामवंत कंपनीचा सीईओ बनला याचा आनंद असतानाचा त्यांना किती पगार दिला जाणार याची उत्सुकता भारतीयांच्या मनात आहे. ट्वीटर ने अमेरिकन सिक्युरिटीज अँड एकस्चेंज कमिशन कडे दिलेल्या माहितीनुसार पराग अग्रवाल यांना वर्षाला १० लाख डॉलर्स म्हणजे ७.५ कोटी पगार आणि सर्व बोनस व स्टॉक दिले जाणार आहेत. पराग यांना दिल्या गेलेल्या ऑफर लेटर मध्ये हे सर्व लाभ २९ नोव्हेंबर २०२१ पासून लागू झाले असल्याचे नमूद केले गेले आहे.
ट्वीटर वर ट्वीटसचे महत्व वाढविण्यासाठी पराग यांनी आर्टीफीशीयल इंटेलीजन्सवर जे काम केले त्याची खूपच तारीफ झाली होती. गेली दहा वर्षे ते ट्वीटर मध्ये काम करत असून त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तम पार पाडली असे डोर्सी यांनीही म्हटले आहे.
पराग अग्रवाल मूळचे राजस्थानच्या अजमेर मधले असून त्यांचा जन्म अजमेरच्या सरकारी रुग्णालयात झाला होता. अग्रवाल यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते आणि भाड्याच्या घरात त्यांचे वास्तव्य होते. आईवडील, आजी आजोबा, बहिण अश्या परीवारात लहानाचे मोठे झालेल्या पराग यांनी मुंबई आयआयटी मधून पदवी घेतल्यावर स्टॅनफर्ड मधून डॉक्टरेट मिळविली आहे. ट्वीटर पूर्वी त्यांनी मायक्रोसोफ्ट, याहू, एटी अँड टी अश्या अनेक प्रसिद्ध कंपन्यात काम केले आहे.