करोनाच्या नव्या व्हेरीयंटचे ‘ओमिक्रॉन’ नामकरण

दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशात सापडलेल्या करोनाच्या बी १.१.५२१ व्हेरीयंट ला जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले आहे. या व्हेरीयंटची उपद्रव क्षमता लक्षात येताच जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली आणि त्यात चर्चा होऊन हे नाव ठरविले गेले आहे. ग्रीक अल्फाबेटवर हे नाव असून यापूर्वी डिसेंबर २०२० च्या शेवटी करोना व्हेरीयंट ला ‘डेल्टा’ नाव दिले गेले होते. या व्हेरीयंट चे वर्गीकरण चिंताजनक म्हणून केले गेले आहे. नाव दिले गेलेले करोनाचे हे पाचवे व्हेरीयंट आहे.

द. आफ्रिकेत या पूर्वी या करोनाच्या काही केसेस आल्या पण एक दिवसात संक्रमण दर ९३ टक्के वाढल्याचे दिसून आले आहे. युवक वर्गात हे संक्रमण अधिक असून आत्तापर्यंत नऊ प्रांतात त्याचा प्रसार झाला आहे. अमेरिकेने या नव्या व्हेरीयंटची गंभीर दखल घेतली आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी या संदर्भात आठ देशात प्रवासावर बंदी घातली आहे. द.आफ्रिका, बोट्स्वाना, झिम्बाब्वे, नामिबिया, लेसोयो, इस्वातिनी, मोझांबिक, मलावी या देशांचा त्यात समावेश आहे. आफ्रीकेशिवाय अन्य तीन देशात त्याचा प्रसार झाला आहे.

भारतानेही करोनाच्या या नव्या व्हेरीयंट बाबत सावधगिरीचे उपाय आखले आहेत. भारतीय वैज्ञानिकांनी या व्हेरीयंटचा डेल्टा व्हेरीयंट बरोबर संयोग अतिशय धोकादायक ठरू शकतो असे मत व्यक्त केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अन्य देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळ हद्दीतच विलगीकरणात ठेवले जावे असे सुचविले गेले आहे.