करोनाच्या नव्या व्हेरीयंटने जगाची चिंता वाढविली

दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या करोनाच्या मल्टीपल म्युटेशन व्हेरीयंट ने जगासमोर पुन्हा चिंतेचा डोंगर उभा केला आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक शुक्रवारी बोलावली गेली असल्याचे समजते. हे नवे व्हेरीयंट अतिशय वेगाने पसरत आहे. द. आफ्रिकेत रोज सरासरी १०० करोना संक्रमित सापडत होते ती संख्या अल्पावधीत दररोज सरासरी १२०० वर गेली आहे. वैज्ञानिकांनी या नव्या व्हेरीयंटला बी १.१.५२९ असे नाव दिले असून हा नवा कोविड काळजी करण्यासारखा असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या करोना व्हेरीयंटचे आत्तापर्यंत ३२ वेळा म्युटेशन झाले आहे आणि ज्या वेगाने तो रूप बदलत आहे त्यामुळे सध्या करोनासाठी ज्या प्रतिबंधक लसी आहेत त्या त्याच्यावर कितपत प्रभावी ठरतील याची शंका व्यक्त केली जात आहे. कारण सध्याच्या लसी या विषाणूच्या स्पाईक नमुन्यावरून बनविल्या गेल्या आहेत आणि नवीन व्हेरीयंट मध्ये हे स्पाईकच बदलले असल्याचे दिसून आले आहे.

द. आफ्रिका बोत्सवाना आणि हॉंगकॉंग मध्ये या विषाणूचा प्रसार आहे आणि वेगाने तो जगभर होत आहे. करोनाचे बिटा व्हेरीयंट गतवर्षी प्रथम द.आफ्रिकेतच मिळाले होते. या नव्या व्हेरीयंटची गंभीर दखल भारत सरकारने घेतली असून हॉंग कॉंग, द.आफ्रिका, बोट्स्वाना देशातून भारतात येणाऱ्या सर्व नागरिकांची कसून चाचणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्राने सर्व राज्यांना  सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ब्रिटनने आफ्रिकेतील सहा देशात विमान सेवा बंद केली आहे.