९१ टक्के लसीकरण होऊनही न्यूझीलंड मध्ये करोना उद्रेक
युरोपीय देश करोनाचे केंद्र बनले असतानाच न्यूझीलंड मध्ये सुद्धा करोना उद्रेक झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. देशात ९१ टक्के जनतेला कोविड १९ लसीचा पहिला डोस दिला गेला आहे तर ८३ टक्के नागरीकांचे दोन्ही डोस घेतले गेले आहेत. तरीही करोना केसेस वाढत असल्याचे दिसून आले आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसरऱ्या लाटेत न्यूझीलंड मध्ये सर्वात कमी करोना केसेस होत्या आणि त्या देशाने वेळेवर लॉकडाऊन लावून आणि करोना नियमावलीचे काटेखोर पालन करून करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवले होते.
सोमवारी न्यूझीलंड मध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटच्या २०५ नवीन केस सापडल्या असून देशात करोना संक्रमितांची संख्या १०,१७६ वर गेली आहे. सिन्हुआच्या बातमीनुसार नवीन केसेस मधील सर्वाधिक संक्रमित ऑकलंड मध्ये असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. करोना मुळे मृत्यू झालेल्याची एकूण संख्या ४० वर गेली आहे.
१७ नोव्हेंबरपासून मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या, सार्वजनिक सुविधांचा वापर करणाऱ्या आणि पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी ‘माय वॅक्सिन पास’ लाँच केले गेले असून करोना लसीकरण स्थितीचे हे अधिकृत रेकॉर्ड आहे. ज्या ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे अश्या सर्व ठिकाणी नागरिकांना जाता यावे यासाठी ही नवी सुविधा आणि सुरक्षा दिली गेली आहे. सोमवारी यासाठी ११.३ लाख लोकांनी असे पास घेण्यासाठी नोंदणी केल्याचे सांगितले जात आहे.