मिशांच्या केसापासून बनविला सूट

प्राण्यांच्या फर पासून अनेक वस्तू बनविल्या जातात आणि ही प्रथा जगात सर्वत्र रुळलेली आहे. प्राण्याच्या फर पासून बनविलेल्या पर्सेस, उबदार कोट महाग असतात. पोलीटिक्स मेन्सवेअर ब्रांड या ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने पुरुषांच्या मिशांच्या केसापासून बनविलेला सूट सादर केला आहे. मेलबर्न निवासी व्हिज्युअल आर्टिस्ट पामेला क्लीमान पासी हिने हा सूट तयार केला असून तो मुव्हेम्बर नावाच्या कार्यक्रमात सादर केला गेला. हा कार्यक्रम दरवर्षी नोव्हेंबर मध्ये होतो. यात जगभरातील पुरुषांना मिशा वाढविण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य पुरुषांमधील आजारांबाबत जनजागृती करणे हा आहे. त्यातून यंदा पुरुषांच्या मिशांच्या केसांपासून सूट बनविला गेला. तो पाहून अनेकांना किळस आली तर अनेकांनी नाके मुरडली तर अनेकांना ही कल्पनाच विचित्र वाटली. या सूटचे नाव ‘ कोमो हेअर सूट’ असे ठेवले गेले आहे.

पामेलाने हा सूट बनविण्यासाठी कसून मेहनत घेतली असून त्यामागे कारण सुद्धा तसेच भावूक करणारे आहे. तिच्या पतीचे प्रोस्टेट कॅन्सरमुळे निधन झाले आहे. जगातील सर्व पुरुषांनी त्यांच्या आजारांबाबत जागरूक असावे असे तिला वाटते. हा सूट बनविण्यासाठी तिने विविध सलून मधून मिशांचे केस एकत्र केले. मिशा केसाची पॅकेज पाठविली गेली. पुरेसा साठा झाल्यावर तिने हा अनोखा सूट तयार केला आहे.