टी २० वर्ल्ड कप विजयाची धुंदी, बुटातून बियर पिऊन साजरी

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप मध्ये प्रथमच विजयी झालेल्या ऑस्ट्रेलियाने जोरदार जल्लोष साजरा केला. त्यातही या संदर्भात व्हायरल झालेला एक व्हिडीओ अधिक बोलका ठरला आहे. या व्हिडीओमध्ये विजयाचा जल्लोष साजरा करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यु वेड व मार्क्स स्टॉयनिस आनंदाच्या भरात बुटात बिअर ओतून पिताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

रविवारी टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने चार विकेट घालवून १७२ धावा केल्या होत्या. त्यात कप्तान केन विलियमसन ने ४८ चेंडूत १० चौकार, ३ षटकार ठोकून नाबाद ८५ धावा करून मोठे योगदान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ दोन खेळाडू गमावून हि धावसंख्या पार करून देशासाठी पहिल्या वहिल्या टी २० वर्ल्ड कप विजयाची नोंद केली. विजयी फटका लागताच वेडने पायातील बूट काढला त्यात बिअर ओतली आणि बियरचा आस्वाद घेतला. त्याच्या पाठोपाठ त्याच बुटात बिअर ओतून स्टॉयनिकनेही बिअर चा आस्वाद घेतला. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केल्यावर अवघ्या २० मिनिटात त्याला ३० हजार लाईक मिळाल्याचे समजते.

ऑस्ट्रेलियाने टी २० वर्ल्ड कप जिंकून हा कप जिंकणारा आठवा देश बनण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, इंग्लंड या देशांनी टी २० वर्ल्ड कप जिंकला आहे.