अमेरिकेत नोकरी सोडण्याची आली लाट

करोना लाटेतून अद्याप न सावरलेल्या अमेरिकेला आणखी एका वेगळ्याच लाटेची काळजी निर्माण झाली आहे. करोना मुळे जगात अनेक देशात बेरोजगारी समस्या बनली असताना अमेरिकेत मात्र नोकरीचा राजीनामा देणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. युएस ब्युरो ऑफ लेबरच्या आकडेवारी नुसार सप्टेंबर मध्ये अमेरिकेत ४४ लाख लोकांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. ऑगस्ट मध्ये ही संख्या ४३ लाख तर जुलै मध्ये ३६ लाख होती.

वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार हॉस्पिटॅलिटी व रिटेल क्षेत्रात नोकऱ्या सोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही काळ नोकरी बदलण्याच्या विचारात असलेले लोक सुद्धा नोकरीचा राजीनामा देत आहेत. अमेरिकेत स्टार्टअप कडे वाढता कल दिसत असून नोकरी सोडणाऱ्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे.

यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. मागितल्यानुसार वेळेवर सुट्टी न मिळणे, कामाचा अधिक ताण, मालकांची अरेरावी, कमी पगार, लाईफस्टाईल बदलण्याची इच्छा अशी कारणे आहेतच पण करोना काळात वर्क फ्रॉम होम  करता येत होते पण आता अनेक कंपन्या ऑफिस मध्ये येऊन काम करण्यास सांगत आहेत आणि ज्यांनी घरून काम केले त्यांना ऑफिसला जाणे त्रासाचे वाटत आहे. याचे कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम मुळे कुटुंबांसमवेत वेळ घालविण्याची सवय लागली आहे.

याचा परिणाम कुशल कामगारांची कमतरता जाणवण्यात झाला असून बड्या उद्योगांच्या मालकांसमोर उद्योग सुरु ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे.