ही आहेत अतिशय सुंदर जपानी ‘फॉरेस्ट होम्स’

house
हे घर एखाद्या परीकथेमधले असावे असे वाटत असले, तरी अश्या प्रकारची घरे जपान देशामध्ये खरोखरच अस्तित्वात आहेत. ‘जीक्का’ असे नामकरण केले गेलेले हे घर पाच लहान लहान तंबुवजा खोल्यांचे संकुल आहे. या पाच तंबूवजा खोल्या एकत्र जोडून जीक्का बनविले जाते. बाहेरून हे घर अगदी लहानसे दिसत असले, तरी आतमध्ये या घरांची प्रत्येक खोली अतिशय प्रशस्त, हवेशीर आहे. जपानी स्थापत्यविशारद इसई सुमा यांनी जीक्काची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. हे घर एखाद्या झोपडी प्रमाणे लहानसे असूनही एखाद्या प्रार्थनास्थळी गेल्यानंतर जसा सकारात्मक शक्तींचा अनुभव होतो, तसाच अनुभव करून देणारी ही घरे असल्याचे सुमा म्हणतात.
house1
जपानच्या शिझोउका प्रांतातील डोंगरी भागांमध्ये तयार करण्यात आलेली ही घरे उंचावर बांधण्यात आली असल्याने सभोवतालच्या डोंगरांचे सुंदर दृश्य या घरांमधून नजरेला पडते. २०१५ साली या घरांचे निर्माण पूर्ण झाल्यांनतर साठी ओलांडलेल्या दोन महिलांनी या घरांमध्ये स्थलांतर केले. येथे राहून त्यांच्या प्रमाणेच किंवा त्यांच्या पेक्षा वयाने अधिक वृद्ध असलेल्या लोकांची सेवा करण्याचा या दोघींचा मानस आहे.
house2
या महिला त्यांच्या आसपास असणाऱ्या, घराबाहेर पडण्यास असमर्थ असलेल्या वृद्धांना भोजन पुरविण्याचे काम करतात. इतकेच नव्हे, तर दररोज दुपारी बारा ते चार या वेळामध्ये यांचे घर सर्व वृद्धांकरिता भोजनासाठी खुले असते. तसेच एखादी वृद्ध व्यक्ती आजारी असल्यास त्यांची सुश्रुषा करण्यासाठी त्यांना मुक्कामाला ठेऊन घेण्याची व्यवस्था देखील या घरांमध्ये आहे.

Leave a Comment