शाही घराण्यातील या व्यक्ती परदेशी प्रवास करताना सोबत जरूर नेतात ही वस्तू


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केली असल्याने आता आपल्या औपचारिक जबाबदाऱ्या त्यांनी इतर शाही सदस्यांना सोपविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांच्या बहुतांशी जबाबदाऱ्या त्यांचे थोरले चिरंजीव आणि ब्रिटीश सत्तेचे भावी राज्यकर्ते प्रिन्स चार्ल्स आणि चार्ल्स यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स विलियम यांनी घेतल्या आहेत. औपचारिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शाही सदस्यांना नेहमीच देशोदेशी भेटी द्याव्या लागत असतात. राणी एलिझाबेथ यांनी वयापरत्वे आता औपचारिक प्रवास कमी केले असले, तरी एक काळ असा होता, जेव्हा राणी एलिझाबेथ वर्षातून सातत्याने अनेक महिने देशोदेशीच्या औपचारिक भेटींच्या निमित्ताने प्रवास करीत असत. आता ही जबाबदारी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्स विलियम यांनी संयुक्तपणे उचलली असून, राणी एलिझाबेथचे प्रतिनिधी म्हणून हे दोघे अनेकदा विदेशी दौऱ्यांवर जात असतात.

राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्स विलियम यांना प्रवासासाठी निघताना काही ठराविक नियमांचे पालन करावे लागते. सर्वात मुख्य नियम असा, की राणी आणि राजगादीचे थेट वारस असणारे विलियम आणि चार्ल्स कधीही एकत्र प्रवास करीत नाहीत. दुर्दैवाने काही अपघात झालाच तर राणी आणि त्याच्यानंतर राजगादीचे थेट वारस (direct heir) यांचे सर्वांचे जीव एकत्रितपणे धोक्यात येऊ नयेत यासाठी हा नियम पाळला जाणे आवश्यक ठरते. प्रवास करीत असताना राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्ल्स, आणि प्रिन्स विलियम यांना एक वस्तू जरूर आपल्यासोबत न्यावी लागत असते. ती वस्तू म्हणजे त्यांच्या स्वतःच्या रक्ताने भरलेली एक ब्लड बॅग.

औपचारिक भेटींच्या निमित्ताने देशोदेशी प्रवास करणाऱ्या या शाही सदस्यांच्या बाबतीत कोणतीही आकस्मिक घटना घडून त्यांना रक्त देण्याची वेळ आलीच तर या ब्लड बॅगमधील रक्ताचा उपयोग करण्याच्या दृष्टीने या ब्लडबॅग या शाही सदस्यांच्या सोबत नेहमीच ठेवल्या जातात. हे तीनही शाही सदस्य औपचारिक भेटींच्या निमिताने दूरवर प्रवास करीत असल्यास त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यामध्ये त्यांचे खासगी वैद्यकीय चिकित्सकही प्रवास करीत असतात. या शाही सदस्यांच्या रक्ताने भरलेल्या ब्लड बॅग याच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असतात. विशेषतः हे शाही सदस्य जर अश्या ठिकाणी प्रवास करीत असतील जिथे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास योग्य रक्तगटाचे रक्त मिळणे काहीसे अवघड असेल, अश्या वेळी केवळ विमानप्रवासाच्या दरम्यानच नव्हे, तर त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्येही त्यांचे वैद्यकीय चिकित्सक ब्लड बॅग्जसह प्रवास करीत असतात.

राणी एलिझाबेथ यांचे खासगी वैद्यकीय चिकित्सक रॉयल नेव्ही मध्ये तैनात डॉक्टर असून, राणीच्या सोबत सातत्याने ते ही प्रवास करीत असतात. शाही सदस्यांच्या रक्ताने भरलेल्या ब्लड बॅग्जच्या व्यतिरिक्त या डॉक्टरांच्या सोबत एक मोबाईल डीफिब्रीलेटर, आणि इतर अत्यावश्यक औषधे असतात. तसेच राणी किंवा इतर शाही सदस्य परदेशी दौऱ्यावर असताना ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या ठिकाणापासून सर्वात जवळचे हॉस्पिटल कुठे आहे, किती दूरवर आहे, त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत, ही सर्व माहितीदेखील दौरा सुरु होण्याअगोदरच गोळा केली जात असते.

Leave a Comment