आता अमेरिकेतील कावळ्यांनाही ‘हाय कोलेस्टेरॉल


न्यूयॉर्क शहरामध्ये राहणारी अँड्रीया टाऊनसेंड हिला तिच्या घराच्या परसददारी बागडणाऱ्या पक्ष्यांना काही ना काही खाऊ घालण्याची अगदी बालपणापासून हौस होती. पण पक्ष्यांना निरनिराळे खाद्यपदार्थ खायला घालताना हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतील अथवा नाही याचा विचार ती नेहमीच करीत असे. अँड्रीयाने आपले पक्षी प्रेम आता व्यवसायाच्या रूपात स्वीकारले असून, ती आता एक ऑर्नीथोलॉजिस्ट, म्हणजेच पक्षीतज्ञ म्हणून कार्यरत आहे. अँड्रीया सध्या क्लिंटन, न्युयॉर्क येथील हॅमिल्टन कॉलेजमध्ये काम करीत असून, आजही पक्ष्यांना खाऊ घालण्याचा तिचा नित्यक्रम सुरु असतो. मात्र आता ती पक्ष्यांना खाऊ घालत असलेले पदार्थ शक्यतो पौष्टिक असतील याची काळजी ती घेत असते. पण केवळ रिसर्चच्या उद्देशाने तिने पक्ष्यांना विशेषतः माणसांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला पदार्थ, चीझ बर्गर खायला घालून त्याचे परिणाम या कावळ्यांच्या आरोग्यावर कसे होतात हे पाहण्याचे ठरविले. तिच्या रिसर्च संबंधीचा रिपोर्ट अलीकडेच ‘द कॉन्डोर’ नामक जर्नल मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

या रिपोर्टच्या अनुसार शहरांमध्ये राहणाऱ्या कावळ्यांना चीझबर्गर खाऊ घातल्यानंतर त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरोलमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. शहरामध्ये राहणाऱ्या इतर प्राण्यांच्या प्रमाणे कावळ्यांचा आहारही मुख्यत्वे कचऱ्यामध्ये जे अन्न सापडेल त्यावरच अवलंबून असतो. यामध्ये प्रोसेस्ड पदार्थांचा समावेश जास्त असल्याचे दिसून आहे आहे. तसेच पर्यटनस्थळांच्या आसपास रहात असणाऱ्या कावळे, चिमण्या आणि आणि इतर पक्ष्यांच्या कोलेस्टेरॉलमध्ये वाढ झाली असल्याचे ही या रिपोर्टमध्ये नमूद केले गेले आहे. गावांमध्ये किंवा शहरांपासून लांब राहणाऱ्या कावळ्यांच्या मानाने शहरी कावळ्यांमध्ये कोलेस्टेरोलचे प्रमाण अधिक असून, हे तथ्य सिद्ध करणारा प्रयोग एकशे चाळीस कावळ्यांवर करण्यात आला.
या प्रयोगामध्ये मॅकडोनाल्डस या लोकप्रिय फास्ट फूड चेनमधील सुमारे शंभर चीझ बर्गर्स मागविले गेले असता, या कावळ्यांनी एका दिवसांत प्रत्येकी एकाहून अधिक बर्गर्सचा फडशा पाडल्याचे दिसून आले. या पैकी काही कावळ्यांनी बर्गर्सचे काही तुकडे स्वतःसाठी साठवून ठेवल्याचेही निदर्शनास आले. तसेच शहरी कावळे जास्त धष्टपुष्ट असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment