यूपीएससीत उत्तम यश मिळविण्यासाठी योग्य विषयांचे चयन महत्वाचे


युपीएससीच्या परीक्षांमध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होण्यासाठी योग्य विषयांचे चयन आवश्यक असल्याचे, सिनियर आयएएस अधिकारी आणि राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांनी म्हटले आहे. डायनामाईट न्युज युपीएससी कॉन्क्लेव्ह २०१९ तर्फे आयोजित परिसंवादात आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या तरुणवर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिव्हील सर्व्हिसेस परीक्षा कश्याप्रकारे उत्तीर्ण करता येणे शक्य आहे, या विषयावर हा मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. २०१५ साली युपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इरा सिंघल, २०१७ साली प्रथम आलेल्या के आर नंदिनी आणि दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनु कुमारी देखील या परिसंवादात वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.

इरा सिंघल यांनीही परीक्षार्थींना मार्गदर्शन करीत, स्पर्धा परीक्षांची तयारी ग्रॅज्युएशन नंतर त्वरित करणे आवश्यक असल्याचे सांगत ज्या भाषेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा दिली जाणार आहे, त्या भाषेवर प्रभुत्व असणेही अतिशय आवश्यक असल्याचे सांगितले. सातत्याने परिश्रम घेतल्याने परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास बळावत असल्याचे के आर नंदिनी म्हणाल्या. तसेच परीक्षा देत असताना एखाद्या खेपेला अपयश पदरी आले तरी खचून न जाता प्रयत्न करीत रहाणेही महत्वाचे असल्याचे नंदिनी म्हणाल्या.

युपीएससीच्या परीक्षा देण्याची इच्छा असणारे अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासेसमधील मार्गदर्शनावर अवलंबून राहतात. पण तसे न करता स्वाध्यायाला जास्त महत्व देणे गरजेचे असून, एकाग्रता आणि परिश्रम, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचे अनु कुमारी यांनी परीक्षार्थींना मार्गदर्शन करताना म्हटले. या वक्त्यांच्या शिवाय स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे पूर्व चेअरमन एस के रुंगटा, आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस) आणि दिल्ली प्राणीसंग्रहालयाच्या अध्यक्षा रेणू सिंह, या वक्त्यांनीही परीक्षार्थींना मार्गदर्शन केले.

या परिसंवादामध्ये भारतभरातील मोठ्या शहरांमधील आणि लहान गावांतीलही अनेक परीक्षार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मुख्यत्वे आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, तमिळ नाडू, महाराष्ट्र, ओरिसा, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथील ग्रामीण विभागांतून आलेल्या परीक्षार्थींचा सहभाग मोठा होता.

Leave a Comment