वॉटर फास्टिंग आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम


पाणी हा आपल्या शरीरासाठीचा आवश्यक घटक आहे. आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलेले असते. त्यामुळे आवश्यक मात्रेमध्ये पाणी प्यायले जाणे, उत्तम आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे ठरते. आवश्यक तेवढ्या पाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती चांगली राहून त्वचचेचे आरोग्य चांगले राहते. अनेक लोक आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारावे यासाठी वॉटर फास्टिंगचा पर्याय निवडतात. ही पद्धत गेल्या अनेक शतकांपासून अस्तित्वात असून, यामुळे शरीर आणि मन निरोगी रहात असल्याचे म्हटले जात आले आहे. वॉटर फास्टिंग अनेक आजारांवरही उपयुक्त मानले गेले असून, त्यामुळे शरीरामध्ये नव्या, निरोगी पेशी तयार होण्यास मदत होते. अनेकविधरित्या फायदेशीर असूनही वॉटर फास्टिंग सर्वांनाच सोसवेल असे मात्र नाही. म्हणूनच ही उपचारपद्धती अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

वॉटर फास्टिंगमध्ये अन्नाचा त्याग करून केवळ पाणी प्यायले जाते. हे फास्टिंग चोवीस तास करायचे असते. अनुभवी आणि नियमितपणे वॉटर फास्टिंग करणारी मंडळी दहा दिवसांपर्यंतही हा ‘उपवास’ (फास्ट) ठेऊ शकतात. आजकालच्या काळामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर पडावेत यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंगचा पर्याय खूपच लोकप्रिय होऊ लागला आहे. मात्र ज्यांच्या ब्लड शुगर लेव्हल्स ‘लो’ असतील, ज्यांना काही ‘इटिंग डिसॉर्डर’ (बुलिमिया, अनोरेक्सिया) असतील, त्यांनी वॉटर फास्टिंग करू नये. त्याचबरोबर एड्स किंवा क्षयाने ग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला, स्तनपान करविणाऱ्या महिला, किडनी किंवा लिव्हरशी निडित आजाराने ग्रस्त रुग्ण, मद्यपी, हृदयरोग, किंवा इतर काही गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांनीही वॉटर फास्टिंग करू नये. हा उपवास चोवीस तासांसाठी करायचा असून, त्यापेक्षा जास्त वेळ हा उपवास करायचा झाल्यास डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे. फास्टिंगचा काळ संपला, की एकदम खूप सारे भोजन न घेता, स्मूदी, किंवा पातळ मिल्कशेक, किंवा ताज्या फळांचे रस सेवन करून हा उपवास सोडायचा आहे.

एखादी व्यक्ती प्रथमच वॉटर फास्टिंग करणार असल्यास यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. फास्टिंग सुरु करण्याआधी शरीराला अधिक उर्जा देणारे अन्नपदार्थ सेवन करावेत. शारीरिक श्रम जास्त करावे लागणार नाहीत अश्या बताने फास्टिंगसाठी दिवस निवडावा. जर तब्येत बरी नसेल, किंवा खूप शारीरिक थकवा आला असेल तर फास्टिंग टाळावे. सुरुवातीला एकदम काही दिवसांसाठी फास्टिंग न करता, केवळ चोवीस तासच फास्टिंग करावे. फास्टिंगसाठी जो दिवस निश्चित केला असेल, त्या पूर्वी काही दिवस आधीपासूनच आहारामधून कर्बोदके, आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थ कमी करावेत. त्या ऐवजी फळे, भाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. फास्टिंग करताना आवश्यक तेवढे पाणी प्यायले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच खूप पाणी एकाच वेळी न पिता दिवसभरात थोडे थोडे पाणी वारंवार पीत रहावे. फास्टिंगचा काळ संपला, की अतिशय हलका आहार असावा.

वॉटर फास्टिंग करताना त्याचे अनेक परिणाम शरीरावर दिसून येऊ लागतात. पहिल्या दिवशी शरीरामध्ये अन्न न गेल्याने डोकेदुखी, मळमळ अश्या समस्या उद्भवू शकतात. दुसऱ्या दिवशी अंगदुखीही जाणवू शकते. तिसऱ्या दिवशी मात्र अन्नाचा अभाव शरीराच्या अंगवळणी पडल्याने शरीराची मरगळ आपोआप कमी होते. तसेच शरीरामध्ये अन्न नसल्याने शरीराला उर्जा देणारा स्रोत नाहीसा झालेला असतो, त्यामुळे काहींना या वेळी थंडी वाजत असल्याची भावना होऊ शकते. चौथ्या दिवशी कमी काळासाठी झोप घेऊनही ताजेतवाने वाटू लागते. पाचव्या दिवशी काहींना बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो. यादिवशी शरीरातील सोडियमच्या पातळीमध्ये घट होऊ नये यासाठी पाण्यामध्ये किंचित मीठ घालून ते पीत राहावे. सहाव्या दिवशी पुन्हा अंगदुखी, पाठदुखी अश्या समस्या उद्भवू शकतात. एव्हाना वजन घटण्यासही सुरुवात झालेली दिसून येते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असल्याने श्वासाला दुर्गंधीही जाणवू लागते. सातव्या दिवशी भुकेची भावना बळावू शकते. तसेच त्या व त्यापुढील सोन दिवसांमध्ये अंगदुखी जाणवू शकते. नवव्या दिवशी मात्र शरीरामध्ये नवा उत्साह संचारतो. या दिवशी लघवीचा रंग अधिक गडद असू शकतो.

वॉटर फास्टिंगचे अनेक फायदे दिसून येत असून, याद्वारे उच्चरक्तदाब नियंत्रित होतो. हृदयाचे आरोग्य अधिक चांगले होत असून, काही काळापासून शरीराला ग्रस्त असणारे विकार बरे होण्यास मदत होते. हे फास्टिंग कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास सहायक असून, शरीरामध्ये नव्या आणि निरोगी पेशी तयार होऊ लागतात. या फास्टिंगमुळे शरीरातील चरबी घटून वजनही कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment