सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कोवॅक्सिनला हॉंगकॉंगची मंजुरी
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसतानाच चीन विरोधात सातत्याने आंदोलने सुरु असलेल्या हॉंगकॉंगने भारतीय करोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिनच्या आपदकालीन वापरास मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मेड इन इंडिया, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता दिल्याबरोबर जगातील अनेक देशांनी कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. त्यात ब्रिटन पाठोपाठ आता हॉंगकॉंगने मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आत्तापर्यंत विकसित देशांबरोबर अन्य ९६ देशांनी मान्यता दिली असून हॉंगकॉंगने कोवॅक्सिन अगोदर सिरमच्या कोविशिल्ड, चीनच्या सिनोफार्म, रशियाच्या स्पुतनिक पाच लसींच्या वापरास मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी जगातील आरोग्य संघटनेच्या अपत्कालीन उपयोग यादीमध्ये समाविष्ट आहेत. व्हिएतनामने सुद्धा कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. तर ब्रिटनने २२ नोव्हेंबर पासून कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटन मध्ये आल्यावर विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे.