विना सुई अचूक लसीकरण करणारा रोबो तयार

करोनाचा प्रकोप अजूनही अनेक देशांमध्ये जारी आहे आणि तरी भीतीपोटी अनेक नागरीक लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत. ज्यांना इंजेक्शनची भीती आहे असे लोक लस घेण्यास धजावत नाहीत आणि अश्या आडमुठ्या लोकांना इंजेक्शन देणे डॉक्टर आणि नर्स साठी सुद्धा डोकेदुखी होते आहे. एका कॅनेडियन स्टार्टअपने यावर एक उपाय काढला आहे. यात विना सुई इंजेक्शन दिले जाणार आहेच पण त्यासाठी डॉक्टर किंवा नर्सची गरज नाही. कारण हे इंजेक्शन रोबो देणार आहे.

ओटारियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉटर्लू  मध्ये हा रोबो बनविला गेला आहे. कोबी नावाचा हा रोबो ज्याला इंजेक्शन द्यायचे आहे त्याच्या शरीराचा मॅप बनवितो, कुठे इंजेक्शन द्यायचे ती जागा निश्चित करतो आणि सुई ऐवजी हाय प्रेशर जेटच्या सहाय्याने लस देतो. याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. या रोबोने एक इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देऊन त्याचे कौशल्य सिध्द केले आहे. त्वचेवर असलेल्या सूक्ष्म रंध्रातून त्याने रुग्णाच्या शरीरात औषध सोडले. मिळालेल्या माहितीनुसार ऑटो वाहन मॅपिंग साठी जे तंत्रज्ञान वापरले जाते याचाच उपयोग करून हा रोबो बनविला गेला आहे. कोबी रुग्णाच्या शरीराचा मॅप या तंत्रज्ञानाने तयार करतो मग एआय बेस्ड सोफ्टवेअरच्या सहाय्याने इंजेक्शन कुठे द्यायचे ती जागा निश्चित करतो.

रोबो तयार करणाऱ्या कोबीऑनिक्स कंपनीचे सीईओ म्हणाले या क्रियेत मनुष्य हस्तक्षेप करण्याची गरज नाही. रुग्णाने ऑनलाईन नोंदणी केली आणि क्लिनिकवर आला कि त्याने त्याचे ओळखपत्र कॅमेऱ्यासमोर दाखवायचे. थ्री डी सेन्सरने रुग्णाची ओळख पटविली कि रोबोटिक हात लस घेईल आणि लसीकरण करेल. तज्ञांच्या मते या ऑटोनोमस लसीकरणामुळे डॉक्टर आणि नर्स वा अन्य आरोग्य कर्मचारी यांचा त्यांना असलेल्या संसर्गाच्या धोक्यापासून बचाव होऊ शकेल शिवाय खर्च कमी होईल अशी आशा आहे.