एखादा खजिना म्हटला, की एखादी गुफा, किंवा तळघर, त्यातील सोन्या-नाण्याने भरलेले हंडे, दागदागिने, असे दृश्य साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर उभे रहाते. पण वास्तविक खजिना हा केवळ भुयारांमध्ये किंवा तळघरांमध्ये दडविला जात नसून, पूर्वीच्या राजा-महाराजांच्या काळामध्ये या वैभवाचे सार्वजनिक प्रदर्शन करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे. म्हणूनच राजे राजवाडे आपल्या संग्रही मौल्यवान मूर्ती, जडजवाहीर, रत्ने बाळगत असत. काहींनी आपल्या राजमहालातील भिंती देखील सोन्याने मढवून काढल्या होत्या, इतके वैभव त्यांच्याकडे होते. पण एके काळी अस्तित्वात असणारे हे वैभव आजच्या काळामध्ये मात्र काळाच्या पडद्याआड गेले आहे. या दडलेल्या वैभवाच्या शोधार्थ अनेकांनी आपल्या जीवाची बाजीही लावली, पण एके काळी अस्तित्वात असणारे वैभव आताच्या काळामध्ये कुठे गायब झाले या रहस्याची उकल मात्र आजतागायत होऊ शकलेली नाही.
मौल्यवान रत्नांनी मढविलेली ‘फॅबर्ज ईस्टर एग्ज’ रशियन झार अलेक्झांडर(तिसरा) आणि निकोलस(दुसरा) यांच्या संग्रही होती. ही सर्व ईस्टर एग्ज अलेक्झांडरने आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी बनवविली असून ही सर्व एग्ज अस्सल सोन्याची होती. अलेक्झांडरची पत्नी झारिना मारिया हिला ही एग्ज इतकी आवडली, की दर वर्षी असेच एक ईस्टर एग तिला भेट म्हणून देण्याचे अलेक्झांडरने ठरविले. त्यानंतर दर ईस्टरला हे खास ईस्टर एग बनविण्यात येऊन अशी एकूण बावन्न एग्ज रशियन शाही परिवाराच्या संग्रही होती. अलेक्झांडर नंतर त्याचा मुलगा निकोलस सत्तेत आला असता, १९१७ साली बोल्शेविकांनी सत्तेविरुध्द बंड पुकारून निकोलसला हुसकून लावले. त्यानंतरही सर्व मौल्यवान ईस्टर एग्ज बोल्शेविकांच्या ताब्यात येऊन त्यातील काही क्रेम्लीन येथे ठेवण्यात आली, तर काही नव्या सत्तेसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याच्या दृष्टीने विकली गेली. मात्र या पन्नास एग्ज पैकी सात एग्ज आजतागायत गायब आहेत. ही सर्व एग्ज सोन्याने बनविली गेली असून, त्यावर नीलम आणि इतर मौल्यवान रत्नांची सजावट आहे.
जर्मनी देशातील शार्लोटेनबर्गच्या राजमहालामध्ये एके काळी अन्द्रेआस श्युटलर नामक स्थापत्यविशारदाने ‘अँबर रूम’ नामक एक कक्ष बनविला होता. या कक्षाच्या भिंती सुवर्णपत्राने मढविल्या गेल्या होत्या. आताच्या काळामध्ये या कक्षाची एकूण किंमत पाचशे मिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. काही काळाने हा संपूर्ण कक्ष बर्लिन येथे हलविण्यात आला होता. १७१६ साली राजे फ्रेडेरिक विलियम पहिले यांनी हा कक्ष रशियाचे झार, पीटर द ग्रेट यांना भेट दिला. त्यानंतर हा कक्ष रशियामध्ये कॅथरीन पॅलेस येथे स्थलांतरित करण्यात आला.
रशियामध्ये या कक्षाची रचना पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला. एकूण पंचावन्न स्क्वेअर मीटर क्षेत्रात विस्तारलेल्या या कक्षाची उभारणी करण्यासाठी सहा टन ‘अँबर’ आणि सुवर्णपत्रांचा वापर करण्यात आला होता. विश्वयुद्धाच्या काळामध्ये जर्मन सैनिकांनी या कक्षाची मोडतोड करून हा कक्ष पुन्हा जर्मनीला घेऊन जाण्याचे निश्चित केले. त्यानंतर हा कक्ष जर्मनीतील क्योनिग्सबर्ग येथे परत उभारला गेला खरा, पण दुसऱ्या विश्युद्धाच्या काळी सुरु असलेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये या कक्षाची मोडतोड झाली असल्याचे म्हटले जाते. पण काही इतिहासकारांच्या मते त्याकाळी हा कक्ष तुकड्या-तुकड्यांमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविला गेला असल्याने आजही अस्तित्वात आहे, पण तो कक्ष नेमका कुठे आहे, हे मात्र कोणालाच ठाऊक नाही.
१९४८ साली पतियालाचे महाराजे भूपिंदर सिंह यांच्या शाही खजिन्यातून एक मौल्यवान रत्नहार गायब झाला. या रत्नहारामध्ये एकूण २,९३० हिरे जडविलेले असून, आजच्या काळामध्ये या हाराची किंमत १२५ मिलियन डॉलर्स असावी असा अंदाज आहे. या रत्नहाराच्या मध्यभागी एक मौल्यवान हिरा असून हा ‘डी बेअर्स’ हिरा जगामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी म्हणविला जातो. काही काळाने या रत्नहाराचे काही तुकडे निरनिराळ्या ठिकाणी सापडले, मात्र काही तुकडे अद्यापही गायब आहेत.