या क्षेत्रात देखील तुम्ही कमावू शकता उत्तम पैसा


आपल्याकडे भरपूर पैसा असावा, मनात येतील त्या सर्व गोष्टी एका झटक्यात खरेदी करता याव्यात, आयुष्य चैनीचे, ऐषारामी असावे, असे कोणाला वाटत नाही? यासाठी आवश्यक ती सर्व मेहनत घेण्याची तयारी आणि उत्तम कार्यक्षमता अंगी असतानाच उत्तम अर्थार्जन करून लवकरात लवकर आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी योग्य व्यवसायाची निवड करणेही आवश्यक आहे. भारतामध्ये सध्या अश्याच काही व्यवसायांचे पर्याय अतिशय लोकप्रिय मानले गेले आहेत. या व्यवसायांमध्ये उत्तम सॅलरी पॅकेजेस असून, कार्यक्षम आणि हुशार व्यक्तींना या व्यवसायांमध्ये नक्कीच उत्तम प्रगती करता येऊ शकते. भारतामध्ये सध्याच्या काळामध्ये मार्केटिंगचा व्यवसाय उत्तम संधी मिळवून देणारा म्हटला पाहिजे. यामध्ये अर्थाजनाची संधी चांगली असली, तरी या क्षेत्रात मेहनतही भरपूर असते.

एखादी वस्तू किंवा संकल्पना लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी मार्केटिंग कॅम्पेन तयार करण्याची अवघड जबाबदारी या व्यावसायिकांकडे असते. त्यासाठी ग्राहकांना आपले म्हणणे पटून आपण विकत असलेले प्रोडक्ट, किंवा एखादी संकल्पना ते स्वीकारतील अश्या बेताने ही कॅपेन्स तयार करण्यासाठी कल्पकतेची आवश्यकता असते. ज्यांच्याकडे ही कल्पकता पुरेपूर आहे, त्यांच्यासाठी हा व्यवसाय अतिशय उत्तम आहे. या व्यवसायामध्ये अनुभवी लोकांना जास्त प्राधान्य दिले जाते. जितका अनुभव जास्त, तितकेच पे पॅकेजही उत्तम, असे इथले धोरण असते. सर्वसामान्यपणे मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना सात ते बावीस लाखांपर्यंतची पे-पॅकेजेस दिली जातात. या व्यवसायासाठी मार्केटिंग किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन मधील पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असते.

भारतामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सनाही उत्तम पे पॅकेजेस दिली जातात. या व्यवसायामध्ये कॉम्प्यूटर, कॉम्प्यूटर लँग्वेजेस, डिझायनिंग, आणि सिस्टम मॅनेजमेंटमध्ये नैपुण्य आवश्यक असते. जर एखाद्या इंजिनियरने विकसित केलेले सॉफ्टवेअर मार्केटमध्ये लोकप्रिय ठरले, तर त्याला यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागत नाही. सध्याचे युग हे संगणकाचे युग असल्याने या व्यावसायिकांना या क्षेत्रामध्ये पुढील काही वर्षे तरी भरपूर वाव आहे. या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वसाधारणपणे दहा ते वीस वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर बावीस लाखांपर्यंत पे पॅकेजेस मिळू शकतात. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी संगणकशास्त्रामध्ये पदवी, किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असते, किंवा संगणकशास्त्रामध्ये अभियांत्रिकीची पदवी आवश्यक असते.

इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा पर्याय निवडण्यासाठी इतर शिक्षण कोणत्याही शाखेचे असले, तरी गणितावर पकड अतिशय मजबूत असणे आवश्यक आहे. कंपन्या, संस्था, किंवा सरकारी खात्यांनी पैश्यांची गुंतवणूक कश्या प्रकारे करावी, आपली वार्षिक आर्थिक ध्येये कशी साध्य करावीत, इत्यादी बाबतीतले योग्य सल्ले देण्याची जबाबदारी इन्व्हेस्टमेंट बँकर्सची असते. नुकतेच पदवीधर झालेले तरुण-तरुणी सुरुवातीला अॅनालिस्ट म्हणून या व्यवसायामध्ये येतात. त्यानंतर त्यांना या व्यवसायासंबंधी प्रशिक्षण दिले जाऊन मग त्यांच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या क्षेत्रामध्ये अनुभवी व्यक्तींना सव्वीस लाखांपर्यंत पे पॅकेजेस आहेत. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी फायनान्स, अकाऊन्टिंग, किंवा गणितामध्ये पदवी, अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

चार्टर्ड अकाऊंटन्ट, म्हणजेच सीए बनण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भरपूर मेहनतीची आवश्यकता असते. मात्र एकदा या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर व्यवसायाला सुरुवात करून जसजसा अनुभव वाढत जातो, तसतश्या अर्थार्जनाच्या उत्तम संधी चालून येतात. या व्यवसायामध्ये बिझनेस आणि अकाऊन्टन्सीचे अचूक ज्ञान असणे अतिशय महत्वाचे आहे. या व्यवसायामध्ये अनुभव अतिशय महत्वाचा असून, अनुभवी सीए ना वर्षामध्ये ३५ लाख पर्यंतही कमाई करता येऊ शकते. यासाठी वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक असून त्यानंतर सीएची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असते.

सीए प्रमाणेच कमर्शियल एअरलाईन पायलटलाही उत्तम पे पॅकेजेस असतात. आजकाल कमर्शियल एअरलाईन्सचा व्यवसाय चांगलाच तेजीत असल्याने वैमानिकांना मोठी मागणी आहे. या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या वैमानिकांना दहा ते पंधरा वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर पस्तीस लाखांपर्यंतची पे पॅकेजेस मिळू शकतात. वैमानिक म्हणून रुजू होण्यासाठी शास्त्र शाखेची पदवी आवश्यक असून, त्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्स मिळविण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.

Leave a Comment