अरबी (आळकुड्या) आरोग्यासाठी लाभदायी


आजकाल लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय गंभीरपणे विचार करताना आढळतात. यासाठी संतुलित आहार, व्यायाम इत्यादींवर भर देतानाच आहारामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके इत्यादींचे संतुलन साधण्यासाठी निरनिराळे नव्या धाटणीचे अन्नपदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले जात असतात. मात्र वास्तविक आपली खाद्यसंस्कृती पाहता, स्थानिक खाद्यपदार्थांमध्येही तितकीच पोषण मूल्ये आपल्याला मिळू शकतात. म्हणूनच इम्पोर्टेड हेल्थ फुड्सच्या आहारी न जाता स्थानिक अन्नपदार्थांचे महत्व जाणून घेणे आणि ते पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे आवश्यक ठरते. याच अन्न पदार्थांच्या यादीमध्ये अरबी, किंवा आळकुड्यांचाही समावेश आहे. अरबी ही केवळ खाण्यास चविष्ट नाही, तर पौष्टिकही आहे. पण तरीही ही भाजी तितकी लोकप्रिय नाही.

अळूच्या पानांच्या मुळांना अरबी म्हटले जाते. अळूच्या पानांची भाजी, किंवा अळूच्या वड्या हे पदार्थ जरी लोकप्रिय असले, तरी अरबीची भाजी मात्र अभावानेच केली किंवा खाल्ली जात असते. एकतर अरबी शिजण्यास वेळ लागतो आणि अरबी हाताळताना हातांना खाज सुटत असल्याने ही भाजी आवर्जून केली जातेच असे नाही. मात्र अरबी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये डायटरी फायबर मोठ्या प्रमाणात असून, यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषक तत्वे असून, बीटा कॅरोटीन आणि इतर जीवनसत्वेही मुबलक प्रमाणात आहेत.

अरबीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असल्याने वजन घटविण्यासाठी याचे सेवन उत्तम आहे. दर शंभर ग्राम अरबीमध्ये ५.१ ग्राम फायबर मिळते. यामध्ये कॅलरीज देखील कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अरबी ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’, म्हणजेच ज्या पदार्थाचे साखरेत रूपांतर अतिशय सावकाश होते अश्या पदार्थांपैकी एक असून, मधुमेहींसाठी अरबीचे सेवन उत्तम आहे. अरबीमध्ये असलेला रेझिस्टन्ट स्टार्च सहज पचविला जात नाही. यामध्ये असलेली कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सही पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे या पदार्थाचे रूपांतर त्वरेने साखरेत होत नाही. यातील फायबरमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये ई जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असल्याने अरबी, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजली जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment