करोना प्रतिबंधक गोळीला मान्यता देणारा ब्रिटन ठरला पहिला देश

औषधनिर्माण क्षेत्रातील कंपनी मर्क च्या करोना प्रतिबंधक औषधाला ब्रिटनने गुरुवारी मंजुरी दिली आहे. हे औषध गोळी स्वरुपात असून आत्तापर्यंत करोनाच्या इलाजात इंजेक्शन द्यावे लागत होते. त्यामुळे जगातील पहिल्या करोना प्रतिबंधक गोळीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. अमेरिकेच्या मर्क व रिजबॅक बायोथेराप्यूटिक ने संयुक्त रित्या हे औषध विकसित केले आहे. ब्रिटनच्या मेडिकल व हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी एमएचआरए मोलोनुपिरावीरच्या वापरास परवानगी दिली असून ब्रिटन मध्ये हे औषध लागेब्रायो नावाने विकले जाणार आहे. या औषधाचा वापर करोनाचे हलके आणि गंभीर प्रकारचे संक्रमण असलेल्यासाठी होणार आहे.

कोविड १९ चाचणीचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर हे औषध देता येईल. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील सल्लागारांची एक बैठक होणार असून त्यात या औषधाची सुरक्षा व प्रभावीपणा यावर समीक्षा केली जाणार आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या एफडीए कडे कंपनीने कोविड १९ प्रतिबंधक या औषधाच्या वापरला मान्यता मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे.

मर्कचे सीईओ आणि अध्यक्ष रोबर्ट डेव्हीस म्हणाले करोनासाठी हे महत्वाचे औषध ठरेल आणि जागतिक पातळीवर त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. या गोळीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अमेरिका, ब्राझील, इटली, जपान, द.आफ्रिका, तैवान व ग्वाटेमाला येथे घेतल्या जात असून १७० साईटवर हे परीक्षण सुरु आहे असेही समजते.