संजय दत्त ‘गुड महाराजा’, प्रीती बनणार महाराणी

बॉलीवूड मुन्नाभाई संजय दत्त आणि प्रीती झिंटा यांच्या भूमिका असलेला आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आला आहे. यात संजय दत्त महाराजा तर प्रीती झिंटा महाराणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दुसऱ्या महायुद्ध काळात १ हजार मुले शरणार्थी कॅम्प मध्ये कैद करून ठेवली गेली होती. त्यांना गुपचूप बाहेर काढून जहाजातून लंडनला नेले गेले होते पण त्यावेळी ब्रिटीश सरकारने या मुलांना देशात प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे जहाज हिंदुस्थानात आले आणि गुजराथ च्या नवानगर राज्यात पोहोचले तेव्हा तेथील राजे दिग्विजयसिंग जडेजा यांनी या मुलांना आश्रय दिला, तीन वर्षे त्यांनी या मुलांचे पालनपोषण करून त्यांना शिक्षण दिले. हे राजे ‘जामसाहेब’ या नावानेही ओळखले जात होते.

या आश्रित मुलातील एक, पुढे जाऊन पोलंडचा पंतप्रधान बनला अशी या चित्रपटाची कथा असून ती सत्यकथेवर आधारित आहे. पोलंड मध्ये या महाराजांच्या नावाने रस्ता, शाळा आहे आणि संसदेत त्यांची प्रतिमा लावली गेली आहे. संसदेत याच राजाच्या नावाने तेथे शपथ दिली जाते असेही समजते.

या चित्रपटाचे शुटींग रशिया, पोलंड, जर्मनी, लंडन आणि गुजराथ येथे होणार आहे. संजय दत्त यात महाराजाची भूमिका करणार असून प्रीती झिंटा महाराणी असेल. १ हजार मुले पोलंडच्या शाळेतून घेतली जाणार आहेत शिवाय काही पोलिश कलाकार सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. ऑस्कर विजेते रोमन पोलान्की यांचे दिग्दर्शनासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. पोलान्की ८७ वर्षाचे पोलिश नागरिक असून त्यांचे आईवडील दुसऱ्या महायुद्धात ठार झाले होते. २०२२ च्या नाताळ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात असून ४०० कोटी रुपये खर्चून तो बनविला जात आहे. पोलंड जी ७ फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.