झायडस कॅडिलाने झायकोव्ह डी च्या किंमती केल्या कमी

सरकारने सतत सुरु ठेवलेल्या चर्चेनंतर झायडस कॅडिलाने त्यांच्या झायकोव्ह डी या कोविड १९ लसीच्या डोसच्या किमती कमी केल्या आहेत. पीटीआय रिपोर्ट नुसार आता ही लस प्रतीडोस २६५ रुपयांना मिळणार आहे. अर्थात या संदर्भातला अंतिम करार अजून बाकी असून तो या आठवड्यात केला जाईल असे समजते.

रविवारी या विनाइंजेक्शन देण्यात येणाऱ्या प्रत्येक डोस साठी ९३ रुपये किमतीच्या डिस्पोझेबल वेदनारहित जेट अॅप्लीकेटरची गरज असल्याचे सांगितले गेले आहे. त्या खर्चासह प्रत्येक डोसची किंमत ३५८ रुपये असेल असे समजते. अहमदाबाद येथील या कंपनीने तीन डोसवाली विना इंजेक्शन देता येणारी आणि जगातील पहिली डीएनए बेस्ड लस विकसित केली आहे. या लसीच्या तीन डोस साठी कंपनीने १९०० रुपये किंमत ठरविली होती मात्र सरकारने चर्चा करून कमी किमतीत लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

२८ दिवसांच्या अंतराने हे तीन डोस घेता येणार आहेत आणि ही लस पूर्ण स्वदेशी आहे. २० ऑगस्ट रोजी ड्रग कंट्रोलर विभागाने तिच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून ही लस १२ वर्षे व त्यापुढील वयाच्या लोकांना घेता येणार आहे. सरकारने कोविशिल्ड २०५ रुपये, कोवॅक्सिन २१५ रुपये डोस अश्या दराने लसीची खरेदी केली आहे. केंद्र सरकारने या लसी खरेदी करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविल्या असून आत्तापर्यंत असे ११२ कोटी डोस पुरविले गेले आहेत असे सांगितले गेले आहे.