वर्षभरात दुसऱ्यांदा गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. पण कोरोना अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आला नसल्यामुळे चिंता कायम आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक होणारी वाढ आणि घट दररोज पहायला मिळत असल्यामुळे आणि प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही ट्विट करत माहिती दिली आहे. याआधीही दिलीप वळसे पाटील यांना कोरोना झाला होता. त्यांना वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसंच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सांगितले आहे.

दिलीप वळसे पाटील यांना याआधी गतवर्षी २९ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल पॉझिटिव्ह येताच ते घरी परतले होते. त्यावेळीही त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती.