आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावीला पुण्यात अटक

आर्यन खान प्रकरणातील अमली पदार्थ विरोधी विभागाचा मुख्य साक्षीदार आणि फरारी घोषित केलेला आरोपी किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्याला फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये नेले गेले असल्याचे वृत्त आहे. किरण गोसावी याला पोलिसांनी २०१८ सालच्या फसवणूक प्रकरणात अटक केली असल्याचे सांगितले गेले आहे. या फसवणूक प्रकरणात गोसावी फरारी झाला होता आणि २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी त्याला वाँटेड घोषित केले होते.

एनसीबीने मुंबई गोवा क्रुझवरून शाहरुखपुत्र आर्यन खान आणि अन्य आठ जणांना ताब्यात घेतले होते तेव्हा हा किरण गोसावी एनसीबीच्या कार्यालयात आर्यन बरोबर सेल्फी घेताना दिसला होता. किरण या प्रकरणात एनसीबीच्या मुख्य साक्षीदार आहे. मात्र याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आर्यन प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप प्रत्यारोप लावले गेले होते. एनसीबी कार्यालयात किरण गोसावी साक्षीदार म्हणून हजर होता पण त्यानंतर तो गायब झाल्यावर पुणे पोलीसानी तो पळून परदेशी जाऊ नये म्हणून त्याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी केली होती.

किरण गोसावी याने प्रभाकरचा आरोप आणि व्हिडीओ पाहिल्यावर प्रभाकर खोटे बोलत असल्याचा खुलासा केला होता आणि आपल्या जीवाला धोका असल्याने आपण महाराष्ट्र पोलिसांच्या समोर येणार नाही तर लखनौ पोलिसांसमोर सरेंडर करू असा मेसेज मिडिया मध्ये दिला होता. मात्र अखेर त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रभाकर यानेच आर्यन प्रकरणात २५ कोटी मागितले होते असा गोसावी यांचा आरोप असून त्यासाठी प्रभाकर आणि त्याच्या भावाचे सीडीआर तपासावे म्हणजे खरे काय ते समोर येईल असा आग्रह धरला होता. आता पुणे पोलिसांना तो काय माहिती देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१८ मध्ये किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी पुण्याच्या चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तीन लाख रुपये उकळले आणि त्याची फसवणूक केली असा आरोप होता. त्यानंतर देशमुख यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेरबानो कुरेशीला अटक झाली होती मात्र किरण गोसावी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी वाँटेड घोषित घोषित केले होते.