मुंबई – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्य सरकारकडून या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी किंवा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरण मोहिम देखील व्यापक प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्याती निर्बंध मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्यात आले आहेत. चित्रपटगृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. पण, तरीदेखील तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळी सणासाठी नियमावली जाहीर केली आहे.
दिवाळीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
असे आहेत दिवाळीसाठीचे नियम
- राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. पण, तरीदेखील दिवाळीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी.
- बाजारपेठेत दिवाळीच्या काळात खरेदीसाठी गर्दी होत असते. पण, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.
- मास्कचा वापर, सोशल डिस्टेन्सिंग आणि कोरोनाच्या इतर नियमांचे तंतोतंत पालन करावे.
- फटाक्यांची आतिषबाजी दिवाळीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. कोरोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती असल्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
- दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यक ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.