मुंबई – राज्याच्या शिक्षण विभागाकडून 1 ते 23 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या शाळांना दिवाळीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच 21 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. त्याचबरोबर जर नाताळाच्या सुट्ट्या शाळांना द्यायच्या असतील, तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कमी करुन नियोजन करावे, अशा सूचना देखील शिक्षण विभागाने केल्या आहेत. पण शिक्षकांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांवरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या किती दिवस; शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्या परिपत्रकात नमूद आहे. त्यामुळे नेमक्या कधी आणि कशा दिवाळीच्या सुट्ट्या द्यायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे. ऐनवेळी म्हणजेच सुट्या जाहीर करण्याच्या एक दिवस आधी परिपत्रक काढल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल. या कालावधीत शाळांकडून सुरु असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!