अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा – राजेश टोपे यांच्या सूचना


मुंबई : राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव-2 निलीमा करकेटृटा, वैद्यकीय शिक्षण विभाग प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त वीरेंद्र प्रताप सिंह, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.

टोपे यांनी सांगितले की, राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत अद्यापही सुधारणा अपेक्षित आहे. सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्येच अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत कामकाज होते. पण याबाबत राज्यातील छोट्या शहरातही अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढायला हवे. अवयव दानाबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये अवयव दानाबाबत काम होते. शासकीय दवाखान्यातही अवयवदान व्हायला हवे. यासाठी एक आराखडा तयार करावा, असे निर्देशही टोपे यांनी दिले. अवयवदान बाबत काम करणाऱ्या विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्रांची संख्या वाढवावी. सध्या पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे ही केंद्र आहेत. यापुढे कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर येथे ही केंद्र सुरू करावी, असे टोपे यांनी सांगितले.

अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत लोकांत जागृती करावी. अवयवदानाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ.सुजाता पटवर्धन, डॉ.जी. बी. डावर, डॉ.सुरेंद्र कुमार माथूर, डॉ.राहुल पंडित, आरोग्य विभागाचे उपसचिव शि. मी. धुळे, डॉ.अरुण यादव, डॉ.कैलास जावंदे आदी उपस्थित होते.