लखनौ – सध्या उत्तर प्रदेश सरकारमधील भाजप मंत्री उपेंद्र तिवारी यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार असल्याचे ते म्हणाले आहेत.
भाजप नेते म्हणतात; नरेंद्र मोदी तर देवाचा अवतार
नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले असल्याचे उपेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजप नेत्याने नुकतेच वाढत्या इंधनदरावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नसल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नसल्याचे वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केले. कोरोनाच्या लसी आणि कोरोनावरील उपचार सरकारने मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. जर तुम्ही दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली, तर इंधनाचे दर फार कमी असल्याचा युक्तीवाद तिवारी यांनी केला होता.