पुणे शहराचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी लागू शकतो मार्च 2022 पर्यंतचा कालावधी


पुणे : पुणे शहरातील 50 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना यासाठी पैसे मोजले आहेत. त्यातच आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला पुणे शहराचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे शहरातील 100 टक्के लसीकरण डिसेंबर अखेरपर्यंत होणे कठीण आहे. 84 दिवसांचा दुसऱ्या डोसचा कालावधी आणि लसींचा तुटवडा, या दोन प्रमुख कारणामुळे पुणे शहराच्या 100 टक्के लसीकरणासाठी मार्च 2022 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

18 ते 44 वयोगटातील पुण्यातील 19 लाख 21 हजार लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 44 लाख 69 हजार जणांनी फक्त एक डोस घेतला आहे. म्हणजेच पुण्यातील 41 टक्के लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहे. तर 60 वर्षांवरील 8.69 लाख जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 11 लाख 7 हजार जणांनी लसीचा एक डोस घेतला आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अद्याप जवळपास 6 लाख पुणेकरांना एकही डोस मिळालेला नाही. या सर्वांना ऑक्टोबर अखेरपर्यंत पहिला डोस देण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिला डोस पुढील काही दिवसांत घेणाऱ्यांचा दुसरा डोस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकतो. कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, तो सहज रित्या उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस वर्षाअखेरपर्यंत होईल. पुणे जिल्ह्यातील आर्ध्याहून आधिक लोकसंख्येला अद्याप लस मिळालेली नाही.

याबाबत माहिती देताना पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले की, या महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस 54 दिवसानंतर होईल. लसीकरणासाठी पात्र असलेल्या पुण्यातील सर्वांच्या लसीकरणाला मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागेल. पुढील काही दिवसांत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्के लोकांचे दुसरे डोस पूर्ण होतील. ही संक्या 42 लाख इतकी असेल.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, पात्र असणाऱ्या नागरिकांचे दोन्ही डोस डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊ न शकण्यासाठी विविध कारणे आहेत. जिल्ह्यातील 14 ते 15 टक्के लोकसंख्या बदलणारी असल्यामुळे येणाऱ्यांचे लसीकरण झाले आहे का? हे तपासून पाहवे लागणार आहे. ग्रामीण भागातील काही लोक लस घेण्यास संकोच करत आहेत. त्यांचे लसीकरण करणे हे आमच्यासमोरील मोठे आव्हान असेल. पण आम्ही त्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांसोबत काम करत आहोत. अनेकांचे त्यांच्या मार्फत लसीकरण होईल.

हवेलीमधील जवळपास तीन लाख आणि दौंडमधील एक लाख नागरिकांनी पहिला डोसही घेतला नाही. पुणे शहरातून हवेलीतील काही जणांनी पहिला डोस घेतला आहे. ग्रामीण भागातील सर्वांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. आम्ही लसीकरणासाठी दौंडमध्ये काही उपाययोजना करत आहोत, उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल.