चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपट शुटींग साठी तयार शिपेन्को


रशियन चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांनी ते चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपटाचे शुटींग करण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. शिपेन्को नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्यांच्या ‘द चॅलेंज’ चित्रपटाचे १२ तासाचे शुटींग पूर्ण करून पृथ्वीवर परतले आहेत. शिपेन्को म्हणाले अंतराळ स्थानकात शुटींग करताना चित्रपट शुटींग साठी किती विविध संधी आहेत याची जाणीव झाली. त्यामुळे आता सर्व शक्यता स्वीकारून कुठेही शुटींगची तयारी आहे. शिपेन्को यांनी अभिनेत्री युलिया पेरशिल्ड सोबत अंतराळस्थानकात १२ दिवसात ३० तासांचे शुटींग केले.

रशियन मिडीयाने अंतराळात शूट झालेला जगातील पहिला चित्रपट म्हणून द चॅलेंजला खूप प्रसिद्धी दिली आहे. शिपेन्को यांच्या मते चित्रपटाची कथा स्पेस म्हणजे अंतराळाशी संबंधित असेल तर त्याचे शुटींग अंतराळात झाले पाहिजे असे आता वाटते. त्यामुळे आगामी काळात चंद्रावर किंवा मंगळावर सुद्धा शुटींग साठी आम्ही तयार आहोत.

अॅलन मस्क, जेफ बेजोस या अमेरिकन उद्योजकांनी खासगी रॉकेट लाँच करून जगभर प्रसिद्धी मिळविली असताना रशियाचे रेंगाळलेले स्पेस मिशन, अपघात आणि त्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. कदाचित त्यामुळेच अंतराळातील चित्रपट शुटींगला इतकी प्रसिद्धी दिली जात असावी असे बोलले जात आहे. रशियाने लवकरच स्वतःचे स्वतंत्र अंतराळस्थानक लाँच करण्याची तयारी झाल्याची घोषणा केली आहे.