तब्बल २१ वर्षांनंतर पडद्यावर दिसणार संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी


आजच्या घडीला बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान हा आघाडीचा अभिनेता आहे. सलमान कोणतीही भूमिका असो त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमान गेल्या काही वर्षांपासून सतत अॅक्शनपटांमध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे त्याचे हे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. सलमानचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट तुफान गाजला होता. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी या चित्रपटानंतर एकदाही एकत्र काम केलेले नाही. पण आता ही जोडी पुन्हा एकदा तब्बल २१ वर्षानंतर एकत्र काम करणार आहे.

यासंदर्भात ‘पिंकविला’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. सलमान खानच्या ‘बियॉन्ड द स्टार’ या माहितीपटांच्या मालिकेचा संजय लीला भन्साळी हे एक भाग असणार आहेत. या मालिकेची निर्मिती सलमान खान फिल्म्स द्वारे विझ फिल्म्स आणि Applause द्वारे केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या जीवनावर आधारित या माहितीपटांची ही मालिका असेल. याबाबत काही दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. सलमान खानने यातील काहींशी स्वत: बातचीत केली. संजय लीला भन्साळी हे त्यापैकी एक होते. या माहितीपट मालिकेचा भाग होण्यास संजय लीला भन्साळी यांनी लगेचच होकार दिला आहे. विशेष म्हणजे याचे काही भागही त्यांनी चित्रित करुन ठेवले आहेत. यात सलमानसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. दरम्यान यासोबतच या माहितीपटात संजय लीला भन्साळींसोबत आणखी ३० सदस्य झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रेम आणि द्वेष असे दोन्हीही प्रकारचे संबंध सलमान खान आणि संजय लीला भन्साळी या दोघांमध्ये आहेत. हे दोघेही ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटासाठी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र येणार होते. पण हा चित्रपट काही कारणात्सव रद्द करावा लागला. यामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडल्याचे सांगितले जाते.