वन उद्यानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर द्यावा : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक : नाशिक जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक यासोबतच नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला आहे. देशपातळीवर आदर्श ठरेल असे निफाड तालुक्यात वन उद्यान वनविभागाने तयार केले असून या वन उद्यानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर देण्यात यावा, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज वनविभागाच्या वतीने निफाड येथील नर्सरीजवळ तयार केलेल्या वन उद्यान व मानव बिबट सहजीवन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी आमदार दिलीपराव बनकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह वन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत आहे. परिणामी मानव वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहवयास मिळते. भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी मानवाला वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळुन समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी हे उद्यान वरदान ठरणार आहे. तसेच जिल्ह्यात वन पर्यटनाचा विकास केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. याबरोबरच शालेय जीवनापासूनच वन उद्यानाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे धडे देऊन वन्यजीव व प्राण्यांबद्दल सहानुभूतीची व संरक्षणाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या उद्यानांमध्ये प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आला असून, एक हेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या या उद्यानामध्ये चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती असे सुंदर उद्यान याठिकाणी उभारण्यात आले आहे. अतिशय कमी वेळात व कमी खर्चात उभारण्यात आलेल्या या आकर्षक व माहितीपूर्ण उद्यान निमिर्तीसाठी वन विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे.

आमदार दिलीप बनकर म्हणले की, भविष्यात या वन उद्यानाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना पुस्तकी माहिती सोबतच प्रत्यक्षात वन्य प्राणी व पक्षी यांच्या संदर्भात माहिती मिळणार आहे.त्यामुळे हे उद्यान येणाऱ्या भावी पिढीसाठी देखील माहितीपूर्ण आकर्षणाचा बिंदू ठरेल असेही आमदार बनकर यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात वन विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मनमाड वन परिक्षेत्र, राजापूर परिमंडळ वन परिक्षेत्र येवला,नांदगाव वनपरिक्षेत्र व चांदवड वनपरिक्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे.