आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार रणवीर-दीपिका


क्रिकेट आणि चित्रपट जगताचे फार जवळचे आणि जुने नाते आपल्याला सर्वश्रृत आहे. सिनेसृष्टीत सध्या असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी बॉलीवूड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. तर काही सेलिब्रेटींनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी आणि प्रिती झिंटा यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. आता बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्याही नावाचा या यादीत समावेश होणार आहे. आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ रणवीर-दीपिका ही जोडी खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बरेच बदल येत्या आयपीएलमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऐवजी एकूण १० संघाचा आगामी आयपीएलमध्ये समावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ येत्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा आयपीएलमध्ये समावेश होणार आहे. हे दोन संघ नेमके कोणते असतील? त्यांची नावे काय? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हे दोन संघ खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार असून यात अनेक मोठमोठे कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे. नुकताच त्यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या टीमबद्दल अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान २ नव्या आयपीएल टीमसोबत यंदा खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहेत. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला, तर ते जुही चावला, शाहरुख खान, प्रिती झिंटा यांच्या यादीत सहभागी होतील. यामुळे रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये एक संघ खरेदी करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.