शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर गुन्हे दाखल करु; अजित पवारांचा विमा कंपन्यांना सज्जड दम


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे अतिवृष्टीमुळे मोडले आहे. बळीराजा हाती आलेले पिक उध्वस्त झाल्यामुळे हवालदिल झाला आहे. असे असतानाच शेतकऱ्यांची अडवणूक काही पिक विमा कंपन्या करत असल्यामुळे प्रकार समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा पिक विमा कंपन्यांना सज्जड दम भरला आहे. अजित पवारांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी आडमुठपणाची भूमिका घेत असतील, तर आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही.

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे अडचणीत आहेत. राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असल्यामुळे आपली जबाबदारी विमा कंपन्यांनी पार पाडावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही वेडेवाकडे करा, असे काही सांगत नाही, पण बळीराजाला ज्या नुकसानीमुळे पीक विमा मिळू शकतो, तो मिळालाच पाहिजे. तो त्यांचा अधिकार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.