लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी


अमरावती : लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे मेळघाटातील या गावात २३४ व्यक्तींचे लसीकरण होऊन कार्यक्रम यशस्वी झाला.

धारणी येथून १७ किमी अंतरावर असणारे धाराकोट हे गाव बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. या गावातील कुणीही आतापर्यंत लसीकरणाचा लाभ घेतला नव्हता. काही गैरसमजुतींमुळे कुणीही लसीकरण करुन घेण्यास तयार नव्हते. लसीकरणासाठी गेलेल्या पथकाला दोनवेळा तसेच परतावे लागले. यातून मार्ग कसा काढायचा याचा पेच त्यामुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यापुढे उभा राहिला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोरे व त्यांच्या पथकाने प्रभावी समुपदेशनाची प्रक्रिया राबवली.

प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. संवादाचा सिलसिला गावकऱ्यांचे मत अनुकूल होईपर्यंत निर्धारपूर्वक सुरू ठेवला. लसीकरणाचे फायदे सांगतानाच त्यापासून भीती बाळगणे कसे निरर्थक आहे, हे पटवून दिले. या सातत्यपूर्ण संवादाने चांगला परिणाम केला व गावकरी लसीकरणाला तयार झाले. बिजूधावडीची एक टीम तयार होतीच. त्यांच्या मदतीला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसरे पथक पाठवले. गावात दोन टप्प्यामध्ये २३४ व्यक्तींचे लसीकरण झाले. आरोग्यसेविका स्वाती राठोड, छाया नेमाडे, आरोग्यसेवक राजेंद्र चकुले यांनी योगदान दिले.