चीनी स्मार्टफोनबाबत भारत सरकार अधिक कठोर होणार


भारत चीन लडाख नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परिणामी गेल्या दीड वर्षात भारताने २२० चीनी अॅप्स वर बंदी घातल्यानंतर आता भारत सरकारने चीनी स्मार्टफोन बाबत अधिक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. द मॉर्निंग कॉन्टेक्स्टच्या ताज्या रिपोर्टनुसार भारत सरकारने चीनी स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या फोन मध्ये वापरले जाणारे सुटे भाग आणि फोनसोबत येणारी प्री लोडेड अॅपस बाबतचा डेटा मागविला आहे. तशी पत्रे विवो, ओप्पो, शाओमी, वनप्लस यांना पाठवली गेली आहेत.

प्री लोडेड अॅप्स आणि काही विशिष्ट प्रकारच्या फोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांमुळे भारतीय युजर्सवर नजर ठेवली जात असावी या संशयातून हे पाउल उचलले गेल्याचे समजते. आज भारतीय स्मार्टफोन बाजारात ५० टक्क्याहून अधिक हिस्सा चीनी स्मार्टफोन कंपन्याचा आहे. म्हणजे प्रत्येक दोन स्मार्टफोन मागे एक चीनी स्मार्टफोन आहे. भारतीय युजर्स साठी हे फोन खरोखरच सुरक्षित आहेत काय याचा तपास सरकार करत आहे.

चीनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारत सरकारने सुरवातीला मागितलेला डेटा दिला की त्यानंतर आणखीही एक नोटीस या कंपन्यांना पाठविली जाणार आहे असे सांगितले जात आहे. या नोटीसीमध्ये चीनी स्मार्टफोनची तपासणी करण्याची मागणी केली जाणार आहे. असे घडले तर ही नोटीस म्हणजे चीनी स्मार्टफोन कंपन्यांवर केल्या जाणाऱ्या मोठ्या कारवाईचा एक हिस्सा असेल असेही समजते.