ड्रग्ज प्रकरण; हायप्रोफाईल असल्याची किंमत चुकवत आहे बॉलिवूड इंडस्ट्री – जावेद अख्तर


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये सध्या कैद आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखला जाहीर समर्थन देत आहेत. तर दुसरीकडे काही जण शाहरुख आणि आर्यनबद्दल उलटसुलट चर्चा करताना दिसत आहेत. याप्रकरणी नुकतेच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपासाच्या नावाखाली बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले. त्यांनी यावेळी शाहरुखसह आर्यनलाही समर्थन दिले.

जावेद अख्तर यांनी मुंबईतील जुहू परिसरात चेंजमेकर्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना शाहरुख आणि आर्यन खानच्या अटकेबद्दल प्रसारमाध्यमांनी अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी यावर कोणतीही प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी थेट दिलेली नसली तरी त्यांनी शाहरुखाला पाठिंबा दिला आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, दिग्गज कलाकार यांसह इतरांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचे जावेद अख्तर म्हणाले.


एका बंदरावर (अदानीचे बंदर) काही दिवसांपूर्वी एक अब्ज डॉलर्स किमतीचे कोकेन सापडले होते. तर दुसरीकडे त्याचवेळी एका क्रूझवर १२०० लोकांची तपासणी केली जाते. त्यावेळी त्या ठिकाणी दीड लाख किंमतीचे चरस सापडतो. क्रूझवर अंमली पदार्थ सापडले, ही एक मोठी राष्ट्रीय बातमी होते. पण दुसरीकडे अब्ज डॉलर्स कोकेन सापडले त्याची साधी हेडलाईनही कुठे पाहायला मिळत नाही. ही बातमी काही ठिकाणी पाचव्या किंवा सहाव्या पानावर छापलेली दिसते. यानंतर मग असे म्हटले जाते की, यापुढे जहाजाला आम्ही या बंदरावर येऊ देणार नाही. अरे पण यापूर्वी तुम्हाला जे मिळाले आहे, त्याबद्दल तर बोला, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले.

जावेद अख्तर पुढे म्हणाले, हायप्रोफाईल असल्याची किंमत बॉलिवूड इंडस्ट्री चुकवत आहे. तुम्ही जेव्हा हायप्रोफाईल असता, तेव्हा तुम्हाला खाली खेचण्यास, तुमच्यावर दगडफेक करण्यास, चिखलफेक करण्यास सर्वांना आनंद मिळतो. पण तुम्ही जर कोणीही नसाल, तर मग तुमच्यावर चिखलफेक करण्यास कोणाला आनंद मिळेल? असा सवालही जावेद अख्तर यांनी यावेळी उपस्थित केला.