चीनी हॅकर्सनी काही सेकंदात हॅक केला आयफोन १३ प्रो


युजर्सच्या सुरक्षेची ग्वाही देणाऱ्या अॅपलचा आयफोन १३ प्रो हा नवा फोन चीनी हॅकर्सनी अवघ्या काही सेकंदात सर्व गर्दीसमोर हॅक करून दाखविल्याने युजर्सना मोठा धक्का बसला आहे. चीनच्या चेंगदु मध्ये दरवर्षी ‘तियानफू कप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात हॅकर्स सर्व लोकांसमोर त्यांचे हॅकिंग मधील कौशल्य दाखवितात. गेल्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेत आयओएस १५.०.२ वर चालणारा आयफोन १३ प्रो रेकॉर्ड दोन वेळा हॅक करण्यात आला आणि त्यामुळे उपस्थित हैराण झाले असे समजते.

कूनलुन लॅब टीमच्या सीईओने सर्वांसमोर लाईव्ह सफारी वेब ब्राऊझर वरून आयफोन १३ प्रो अवघ्या १५ सेकंदात हॅक केला. तो कसा हॅक केला गेला याचा अजूनही उलगडा झालेला नाही. मात्र आयफोन हॅक करणारी ही एकच टीम नव्हती. टीम पंगुचा अॅप डिव्हाइस जेल ब्रेकिंगचा इतिहास आहे. त्यांनी आयओएस १५ वर चालणारी, पूर्ण पॅच केलेले आयफोन १३ प्रो रिमोटली जेलब्रेक करून ३ लाख डॉलर्सच्या इनामावर दावा केला आहे.

या हॅकिंग टीम त्यांनी फोन हॅक करण्यासाठी काय काय केले याचे विवरण अॅपलला देणार आहेत. त्यामुळे फोनची सुरक्षितता वाढविण्यासाठी काय बदल करायला हवेत याचा निर्णय कंपनी घेऊ शकेल. ‘तियानफू कप मध्ये केवळ अॅपलच नाही तर विंडोज १०, मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंज, गुगल क्रोम अशी अन्य टार्गेट सुद्धा होती असे समजते.