पुणे म्हाडाची दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी


पुणे : मुंबईतील घऱांच्या वाढत्या किंमतींमुळे मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. पुणे म्हाडाच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरे 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील घरांचा समावेश असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. आठ हजार घरांची सोडत गेल्या एक-दीड वर्षांत काढण्यात आली होती. अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची ‘हॅटट्रिक’ करत पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी आणखी एक विक्रम केला आहे. कोरोनाता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यांमुळे अनेकांची आर्थिक बाजू कोलमडली आहे. अशातच गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याआधी जानेवारी 2020 मध्ये म्हणजेच कोरोनापूर्वी म्हाडाच्या वतीने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच, 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती. या घरांची लॉटरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली होती.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी म्हाडाच्या इतिहासात प्रथमच जाहीर करण्यात आली होती. यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. अशातच आता पुणे म्हाडा दिवाळीचा मुहूर्त साधत आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील आणि सर्व नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील घरांची समावेश असल्याची माहिती नितीन माने पाटील यांनी दिली आहे.