सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : – सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. जेणेकरून प्रश्न, अडचणींच्या सोडवणुकीसाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय घेणे सुलभ होईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवा आदींचा समावेश होता. यावेळी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल. यातील प्रलंबित, प्रश्न अडचणींच्या सोडवणुकीसाठी समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीने प्रलंबित प्रश्न, अडचणींचा आढावा घेऊन, त्यांच्या सोडवणुकीसाठी पर्याय, शिफारशी कराव्यात. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे, ते मार्गी लावण्याचे प्रस्ताव, पर्यायही सादर करावेत. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, तसेच मुख्यमंत्री ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा सत्कारही करण्यात आला.