दिवाळीआधी राज्यातील दुकाने, उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढविण्याबाबतचा निर्णय लवकरच


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सध्या परवानगी आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के एवढ्याच ग्राहकांना उपाहारगृहांमध्ये प्रवेशास मुभा आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांकडून करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीतही वेळमर्यादा शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेषत: उपाहारगृहांना रात्री १० पर्यंतच मुभा असल्यामुळे रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्यांचे हाल होतात. त्यामुळे उपाहारगृहे व बारमालकांकडून वेळेची मर्यादा वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती.

सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाटय़गृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळीपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकाने, मॉलच्या वेळेतही वाढ करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचारविनिमय झाला. या पार्श्वभूमीवर दुकाने, उपाहारगृहे, मॉलवरील निर्बंध आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बंद सभागृहातील २०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आता उठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता लसीची एक मात्रा घेतलेल्यांना आणि आरोग्यसेतू अ‍ॅपवर आरोग्य स्थिती चांगली असलेल्यांना मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान वैज्ञानिक तर्क, लसपुरवठा आदी मुद्दय़ांच्या आधारावर अठरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी रविवारी स्पष्ट केले. अनेक देशांनी मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. पण, आपल्याकडे मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वंकष विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी झायडस कॅडिलाच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. तसेच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला २ ते १८ वयोगटासाठी आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.