उदयनराजेंचे ईडीला पुन्हा आव्हान; कारवाई करणार असाल तरच ईडीने यावे, अन्यथा येऊ नका


सातारा – राज्यातील राजकारण सध्या ईडीच्या कारवायांवरुन रंगले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाडल्या जात आहेत. सध्या ईडीकडून अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी चौकशी केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना पण हा आरोप सातत्याने भाजपकडून फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिले आहे.

ईडीने खुशाल यावे पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नये. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसे असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसमोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झाले, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये, असे आव्हानच उदयनराजेंनी दिले आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे, असे म्हटले आहे.

ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना उदयनराजे भोसले यांनी भाजपलाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे अशा शब्दांत त्यांनी भाजपसहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली, तर सर्वांचीच यादी देतो, असेही ते यावेळी म्हणाले होते.

आपण जसे पेरतो, तसे उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. मी पुराव्यासकट ईडीला यादी देईन, असे उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढतात. आता बस्स झाले राजकारण.