शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर संतापले संजय राऊत !


मुंबई – दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले आहे. आता चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधत, चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यावर टीका केली आहे.

काल मी पाहिले की भाजपचे महाराष्ट्रामधील एक नेते शरद पवारांचा अरे, तुरे असा एकेरी भाषेत करत होते. ही राज्याची परंपरा नाही. आम्ही अशाप्रकारे कधीही नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाही. आम्ही अमित शहांविषयी कधीही अशाप्रकारे बोललो नाही. अटलबिहारी वाजपेयी तर आमचे श्रद्धास्थानच होते आणि आहे. आम्ही आजही अडवाणींना मानतो. पण आपल्यापेक्षा वय, अनुभव, संस्कार, संस्कृतीने मोठे असलेले जी लोक आहेत, त्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी लढावी. लोकशाही माध्यमातून त्यांचा पराभव करावा. हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले आणि तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवारांसारख्या नेत्याचा उल्लेख एकेरीत करता. म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का? या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे. वैद्यकीय देखील आणि नार्को पद्धतीने देखील, असं संजय राऊत यांनी टीव्ही -9 शी बोलताना म्हटले आहे.

तर, पवार या महाराष्ट्रात आपल्याला चॅलेंज नाही, ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळे आयुष्य गेले पण कधी ६० च्या वर क्रॉसच नाही झाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच, या पोटनिवडणुकीसाठी कलाबेन या शिवसेनेच्या उमेदवार असतील, असे शिवसेनेकडून घोषितही करण्यात आले होते व त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये दाखल झालेले आहेत.