रस्ते व शासकीय इमारतींची बांधकामे तातडीने मार्गी लावा- बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला – जिल्ह्यात रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यात अकोला शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतींची बांधकामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधीन रस्ते व शासकीय इमारतीचे बाधकामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,अकोट उपवनसंरक्षक नवल रेडी, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जागतिक बॅंक प्रकल्प इ. विविध संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जागतिक बॅंक प्रकल्प निर्माणाधीन असलेले रस्ते तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतीचे बांधकामाबाबत कामे तातडीने मार्गी लावा. आवश्यकतेनुसार सुधारित प्रस्ताव तयार करुन कामे पूर्ण करा. अपूर्ण कामे कधीपर्यंत पूर्ण होतील याबाबत कालमर्यादेसह अहवाल सादर करा आणि त्या कालमर्यादेचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा. तसेच रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने त्वरीत बुजवा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. पोलीस वसाहत व शासकीय इमारत अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा. तसेच सांस्कृतिक भवनाचे राहिलेले कामे पुर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असेही निर्देश यावेळी दिले.

पुनर्वसित गावातील ग्रामस्थांना मूलभूत सोईसुविधा पुरवा
मेळघाट व्याघ्र पुनर्वसन अंतर्गत अकोट मौजे तालुक्यातील गुल्लरघाट, सोमठाणा, केलपाणी, अमोना व धारगड तसेच तेल्हारा तालुक्यातील मौजे बारुखेडा, नागरतास, अंबाबरवा व तलई अंबाखेड या पुनर्वसित गावांचे समस्या जाणून घेतल्या. या गावातील सर्व अडचणी प्राधान्याने सोडवून गावांतील पोच रस्ते, पाणी पुरवठा, विद्युतीकरण, प्राथमिक आरोग्य व शिक्षण अशा मुलभूत सोईसुविधा पोहोचवा. याकरीता परिपुर्ण प्रस्ताव तयार करुन प्रशासनाकडे पाठवा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.