शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार


नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन केदार यांच्या हस्ते झाले. आमदार मोहन मते, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक शेखर पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. उदय मार्लावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. अजय केवलीया, डॉ. हरीश रावत, डॉ. गणेश ढाकले यावेळी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोविडच्या तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी बजाविलेल्या सेवेबद्दल आभार मानून केदार म्हणाले, येथील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहेच, यासोबतच याठिकाणी बॅडमिंटन कोर्ट, हॉलीबॉल मैदान उभारणीला लवकरच सुरुवात केली जाईल. तसेच इतर अद्ययावत क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी नवीन क्रीडा संकुल उभारणीचा हेतू स्पष्ट केला. तसेच प्रास्ताविकामध्ये डॉ. मुकेश वाघमारे यांनी क्रीडा संकुलाविषयी माहिती दिली.