मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्याला दसऱ्याच्या मुहूर्तावर अनोखे गिफ्ट दिले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता देऊन मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याची भेट दिली आहे. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतूदीनुसार 6 ऑक्टोबर 1975 पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर 60 टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मराठवाड्याला दसऱ्याच्या मुहूर्तावर अनोखे गिफ्ट!
1975 च्या आधी गोदावरी खोऱ्यात पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. आता त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. आता या त्रुटी दूर केल्यामुळे मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकुण 60 + 61.29 = 121.29 टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत गुरुवारी मंत्री जयंत पाटील यांनी 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता दिली आहे.
19.29 टीएमसी पाणी वापर आता मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे 60 टीएमसी आणि आताचे 61.29 टीएमसी म्हणजे 121.29 टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. त्यातील काही प्रकल्प तिथे पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत आणि याचे सर्व श्रेय महाविकास आघाडी सरकारला मराठवाड्यातील जनता देईल, अशी खात्री मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विजयादशमी आणि दसऱ्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.