आता INOX मध्ये लूटा टी-20 विश्वचषक स्पर्धा पाहण्याचा आनंद


नवी दिल्ली : 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार आता मल्टिप्लेक्स चेन असलेल्या आयनॉक्समध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना टीम इंडियाच्या सर्व सामन्यांचा आनंद मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. या वर्षी यूएई आणि ओमनमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. तर बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

याबाबत आयनॉक्सने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, टीम इंडियाचे सर्व सामने आयनॉक्सच्या थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. भारतातील क्रिकेटचे वेड लक्षात घेता आयनॉक्सने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. तसेच या दरम्यान थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचाही अनुभव घेता येणार आहे. या दरम्यान कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय आयनॉक्सने घेतला आहे. या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सामने पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. मेट्रो शहरात हा तिकीट दर 500 रुपये तर इतर शहरात तो 200 रुपये एवढा असेल.

दकम्यान 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात टीम इंडिया टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ जवळपास दोन वर्षानंतर आमने- सामने येणार आहेत. त्यानंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबूधाबीमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरोधात असेल.